छ. संभाजीनगर - शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सुवर्णसंधी; पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (हिंगोली, कळमनुरी, वसमत व सेनगाव) तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय
छ. संभाजीनगर - शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सुवर्णसंधी; पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (हिंगोली, कळमनुरी, वसमत व सेनगाव) तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह (हिंगोली, कळमनुरी व वसमत) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर प्रवर्गातील इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार ऑनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून युजर आयडी व पासवर्ड तयार करावा. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा.

शालेय अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६, तर इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम तसेच इंटरनेट (वाय-फाय) सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज करता येईल. वसतिगृह योजनेसाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार व वसतिगृह या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे.

तरी पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande