
रायगड, 21 जून (हिं.स.)। कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्यातील वीज पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. कर्जत, नेरळ, माथेरान, कशेळे, कळंब, खांडस आदी भागांतील वीज समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून काही महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
ऑगस्ट २०२४ मध्ये समितीने केलेल्या आंदोलनानंतर अनेक रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये सुमारे १०० कोटी रुपयांच्या वीज विकासकामांचा समावेश असून त्यापैकी ६५ कोटी रुपयांची कामे मंजूर होऊन टेंडर प्रक्रियेत आहेत. तसेच आरडीएसएस योजनेअंतर्गत ३७ कोटी रुपयांच्या कामांच्या मंजुरीची प्रतीक्षा सुरू आहे.
याशिवाय कर्जत शहरासाठी प्रस्तावित १२५ कोटी रुपयांच्या भुयारी विद्युतीकरण प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच कर्जत एक्सप्रेस फिडरचे कामही मंजूर झाले असून ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे भविष्यात वीजपुरवठ्यातील अडथळे कमी होऊन ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व कामांसाठी नागरिकांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मंजूर झालेल्या कामांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यासाठी यापुढेही सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)