
अकोला, 21 जून (हिं.स.)।
हिवरखेड येथील जयस्वाल प्लॉट खडकी नजीक भारतीय सैन्य दलाचे आसाम येथे कार्यरत BSF जवान गोपाल रमेश भगत यांच्या पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निवासस्थानी घरफोडी होऊन चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गोपाल भगत हे भारत मातेच्या रक्षणार्थ सीमेवर असताना, आणि त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना त्यांच्या घरात कोणीही हजर नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भर वस्तीत असलेल्या घरी घरफोडी करून लाखो रुपयांच्या मोठ्या ऐवजावर हात साफ केला आहे..
हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम उशिरा दुपारी दाखल झाले. परंतु श्वान पथकाला कोणतेही यश आले नाही.
हिवरखेड परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून विविध अवैध धंद्यांना सुद्धा उधान आलेले आहे. हिवरखेड चे नवीन थानेदार सचिन पाटील आणि त्यांचे सहकारी चोरट्यांना आणि अवैध धंद्यांना पाय बंद घालण्यात आणि चोरट्यांना अटक करण्यात यशस्वी होतात की नाही याकडे हिवरखेड येथील जनतेचे लक्ष लागले आहे..
भारतीय सैन्य दलाचे BSF मध्ये कार्यरत जवान गोपाल रमेश भगत यांच्या पोलीस स्टेशन नजीकच्या निवासस्थानी घरफोडी होऊन चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्या सोबतच चोरट्यांनी आणखी दोन मोटरसायकल सुद्धा एकाच दिवशी चोरल्या होत्या. मकसूद खां हमीद खां वेल्डिंग वाले गोर्धी वेस यांची मोटरसायकल क्र. MH30 BR 0853 ही मोटर सायकल चोरट्यांनी चिचारी रस्त्याने पळवून नेली. परंतु नंतर ती चोरलेली मोटरसायकल वसीम बेग मिर्झा यांच्या घरासमोर सोडून मतीन बेग वकील बेग यांच्या मालकीची मोटर सायकल क्रमांक MH 30 BN 0706 ही मोटरसायकल चोरून चोरटे पसार झाले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी चोरीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक मोटरसायकल चोरट्यांनी सोडून दिली आहे. त्यामुळे हिवरखेड पोलिसांसमोर चोरांचे मोठे आव्हान उभे आहे...
बाजारभावानुसार 15 लक्ष रुपयांच्यावर सोने चोरी??
वृत्त लिहिस्तोवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे लिखित स्वरूपात किती चोरी झाली हे कळाले नसले तरी आजच्या बाजार भावानुसार अंदाजे पंधरा लक्ष रुपयांच्या वर सोने चोरी झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच मतीन मिर्झा यांची होंडा यूनिकॉर्न गाडी दीड लक्ष रुपयांच्या जवळपास होती असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थाना जवळच चोरी
सैन्य दलाचे जवान भगत यांच्या येथे जी मोठी धाडसी चोरी झाली त्यांचे घर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे. दुसरीकडे भगत यांच्या घरापासून काही अंतरावरच एक ठाणेदार, एक पोलीस उपनिरीक्षक तथा काही पोलीस कर्मचारी सुद्धा वास्तव्यास आहेत. तरीसुद्धा एवढी मोठी चोरी झाल्यामुळे आरोपींना जेरबंद करून सजा मिळवून देणे हे पोलीस विभागासाठी मोठे आव्हान आहे. अनेक सीसीटीव्ही मध्ये चोरटे अस्पष्टरित्या दिसून आले आहेत. पोलिसांच्या सभोवताली इतकी मोठी चोरी होत असल्याने चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे याचा विचार करूनच सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे