पातूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा; हिदायत खान नगराध्यक्षपदी विजयी
अकोला, 21 जून (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्षपदावर काँग्रेसने विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिदायत खान यांनी विजय संपादन कर
Photo


अकोला, 21 जून (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्षपदावर काँग्रेसने विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिदायत खान यांनी विजय संपादन करत पातूरच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले आहे.

तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.नगराध्यक्षपदासाठी५ उमेदवार तर २० नगरसेवक पदांसाठी ६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.निवडणुकीत विविध पक्षांनी स्वतंत्र आणि आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी एकत्र येत 'योद्धा विकास मंच' स्थापन केला होता. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आघाडी करत निवडणूक लढवली. राज्यात मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मात्र पातूरमध्ये एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते.

निकालानुसार नगरसेवक पदांच्या २० जागांपैकी योद्धा विकास मंचला ८ जागा, काँग्रेसला ८ जागा, भाजपला २ जागा आणि उद्धव ठाकरे गटाला २ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट)ला एकही जागा जिंकता आली नाही,त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे हिदायत खान विजयी झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दहा वर्षांनंतर नगरपरिषदेची निवडणूक झाल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पातूरच्या राजकारणात या निकालाने नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात नगरपरिषदेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande