अमरावतीच्या पोलिस शिपायाची पाण्याखाली योगसाधना
अमरावती, 21 जून (हिं.स.)। योग साधारणपणे मोकळ्या जागेत किंवा उंच ठिकाणी केला जातो, मात्र अमरावतीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने पाण्याखाली योग साधना करून या परंपरेला नवा आयाम दिला आहे. शिस्त, सहनशक्ती आणि नावीन्यपूर्णतेचा संगम साधत मुख्य पोलिस शिपाई प्रव
पाण्याखाली योगसाधना करून अमरावतीच्या पोलिसाचा विक्रम; योगाला दिली नवी दिशा


अमरावती, 21 जून (हिं.स.)। योग साधारणपणे मोकळ्या जागेत किंवा उंच ठिकाणी केला जातो, मात्र अमरावतीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने पाण्याखाली योग साधना करून या परंपरेला नवा आयाम दिला आहे. शिस्त, सहनशक्ती आणि नावीन्यपूर्णतेचा संगम साधत मुख्य पोलिस शिपाई प्रवीण दादाराव आखरे यांनी केवळ विक्रमच प्रस्थापित केले नाहीत, तर संपूर्ण पोलिस दलालाही प्रेरणा दिली आहे.

११ फूट खोल पाण्यात तब्बल १ तास २ मिनिटे पूर्णपणे स्थिर राहून त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद आशिया बुक रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्ड यांनी घेतली. आपला हा ध्यास कायम ठेवत, २१ जुलै २०२४ रोजी त्यांनी २ मिनिटे ३० सेकंद पाण्याखाली योगासने सादर करून आपल्या कौशल्याचे अनोखे प्रदर्शन केले. २०२४ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, त्यांनी राष्ट्रीय ध्वज हातात धरून ९० सेकंद पाण्याखाली राहण्याचे कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर केले होते. त्यांच्या उत्कृष्ट श्वसन नियंत्रणामुळे हा अनोखा पराक्रम शक्य झाला.

विक्रम प्रस्थापित करण्याबरोबरच, अखरे यांनी सार्वजनिक सुरक्षेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१२ ते २०१९ या कालावधीत त्यांनी पूरनियंत्रण तसेच शोध आणि बचाव मोहिमांमध्ये कार्य केले. या काळात त्यांनी ७ मृतदेहांचा शोध घेण्यास मदत केली तसेच ५५ अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला, अमरावतीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अखरे यांच्या या असामान्य योगसाधनेचे कौतुक केले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, पाण्याखाली योगाभ्यास करणे हे अत्यंत विलक्षण आणि कौतुकास्पद आहे. तर पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनीही त्यांच्या या अनोख्या कामगिरीचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande