आषाढी वारीसाठी व्यापक नियोजन; सर्व विभागांना समन्वयाचे आवाहन
सोलापूर, 21 जून (हिं.स.)। आषाढी यात्रा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, आषाढी एकादशी पालखी सोहळा शांततेत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात द
wari


सोलापूर, 21 जून (हिं.स.)।

आषाढी यात्रा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, आषाढी एकादशी पालखी सोहळा शांततेत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश दिले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या पालखी सोहळा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यावरील अडथळे दूर करणे, रिंगण सोहळ्याची ठिकाणे, मुक्काम स्थळे तसेच रस्ते व पुलांची दुरुस्ती ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच तात्पुरती व कायमस्वरूपी शौचालये स्वच्छ ठेवणे, चिखल होऊ नये याची काळजी घेणे आणि मुक्काम ठिकाणी काँक्रीटीकरण व मुरमीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, आरोग्य सुविधा, औषध किट, फूट मसाज, स्नानगृहे, मोबाईल चार्जिंग व्हॅन, तसेच इंधन व गॅस पुरवठा यांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी अतिरिक्त टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे, निरीक्षण टॉवर, ध्वनीक्षेपक यंत्रणा, अग्निशमन सेवा तसेच नदी परिसरात लाइफ जॅकेट व बोटींग सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी ६५ एकर, वाळवंट परिसर आणि वाखरी येथे स्वच्छता व सुविधा नियोजनाची माहिती सादर केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी ग्रामीण भागातील स्वच्छता, ५,००० फिरते शौचालय, २२० पाण्याचे टँकर, १५८ तात्पुरती उपचार केंद्रे, १२१ बाईक ॲम्बुलन्स आणि ४,५०० मेडिसिन किट वाटपाचे नियोजन सांगितले.

पालखी विश्वस्तांनी मोबाईल नेटवर्क, टोल माफी आणि इतर सुविधा वाढवण्याची मागणी केली असून, सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून वारी यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande