
पुणे, 21 जून (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आणि भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. वारी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर प्रथमोपचार केंद्रे, आवश्यक औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यामध्ये प्रथमोपचार केंद्रांची उभारणी, रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा, वैद्यकीय मनुष्यबळाचे नियोजन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक धूम, पुणे विभागाचे उपसंचालक भगवान पवार तसेच पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि १०८ रुग्णवाहिका सेवेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आषाढी वारीदरम्यान भाविकांना तातडीची आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु