
सोलापूर, 21 जून (हिं.स.)प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड टॉमी हिलफिगर, कॅल्विन क्लाइन ट्रेडमार्क ट्रस्ट या कंपन्यांचे बनावट लोगो वापरून शर्ट तयार करणाऱ्या एका व्यक्तीस शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अजय प्रशांत सुरा (वय २०, रा. गोदुताई विडी घरकुल, कुंभारी) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र सोहनसिंग राजपूत (वय ४०, रा. बिरोलिया, पाली, राजस्थान) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.तक्रारीनुसार, दिल्ली येथील एलयुडीकेशन या कंपनीकडे टॉमी हिलफिगर युरोप बी.व्ही. आणि कॅल्विन क्लाइन ट्रेडमार्क ट्रस्ट या कंपन्यांचे कॉपीराइट व ट्रेडमार्क हक्क आहेत. या हक्कांचे उल्लंघन करून बनावट लोगो वापरून शर्ट तयार केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड