
रत्नागिरी, 21 जून (हिं.स.) । डेरवण (ता. चिपळूण) येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात येत्या ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे.
शिबिरामध्ये घोरणाऱ्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरात स्लिप स्टडी करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णाला घोरण्याचा त्रास कशामुळे आहे, याचे निदान होईल. दररोज एक अशा प्रकारे पंधरा दिवसांत पंधरा स्लिप स्टडी करण्याचा इ. एन. टी. सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांचा मानस आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी वालावलकर रुग्णालयात सुरू झाली आहे.
घोरणे ही केवळ एक समस्या नसून तो एक आजार आहे. या आजारामुळेच बीपी, शुगर, हार्ट अॅटॅक अशा आजारांना आमंत्रण मिळते, हे लक्षात घेऊन लोकांची जनजागृती करण्यासाठी व गरीब रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री घोरणे, सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणे, दिवसभर सतत झोप येणे, गाडी चालवताना झोप येणे, रात्री झोपेत गुदमरल्यासारखे वाटणे, नैराश्य, कोणत्याही कामात उत्साह न वाटणे अशा समस्या असतील तर ही सर्व लक्षणे स्लिप एपनियाची आहेत. त्वरित स्लिप स्टडी करणे गरजेचे आहे. ही लक्षणे असणाऱ्यांसाठी हे शिबिर वरदान ठरणार आहे, अशी माहिती वालावलकर रुग्णालयाच्या संचालक डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी