
रायगड, 21 जून (हिं.स.)। : बदलत्या रोजगाराच्या संधी आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दहावी व बारावीनंतर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारी नोकऱ्यांमधील तीव्र स्पर्धा आणि मर्यादित जागा लक्षात घेता तरुणांचा कल आता रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांकडे वळला आहे.
यंदा राज्यभरात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 90 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.पूर्वी उच्च शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळविणे हे अनेक विद्यार्थ्यांचे ध्येय असायचे. मात्र, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने अनेक युवक बेरोजगारीचा सामना करत आहेत. त्यामुळे आयटीआय, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, कायदा तसेच इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे.
रायगडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उद्योगांचे जाळे विस्तारत असून कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिक शिक्षण संस्थांनी शाळा आणि गावपातळीवर जनजागृती उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. याचा सकारात्मक परिणाम प्रवेश प्रक्रियेत दिसून येत आहे.
दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विविध दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असून अनेक जण रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या अभ्यासक्रमांची निवड करत आहेत.
व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणासह थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास या शिक्षणपद्धतीवर वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत व्यावसायिक शिक्षणाकडे तरुणांचा कल सुमारे 40 टक्क्यांनी वाढल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)