
सोलापूर, 21 जून (हिं.स.)।
पत्नीच्या विवाहपूर्व प्रेमसंबंधाच्या वादातून २० वर्षीय रिक्षाचालकाची रस्त्यात अडवून कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडली. या हल्ल्यात मृत तरुणाच्या भावजीवरही वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत तरुणाचे नाव सिद्धाराम कैलास कटप (वय २०, रा. आकाशवाणी केंद्र परिसर, सोलापूर) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष महादेव पाटील (वय १९, रा. कलावती नगर) याला अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सिद्धारामचा सुमारे वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्याच्या पत्नीचे लग्नापूर्वी आरोपी संतोष पाटील याच्यासोबत प्रेमसंबंध होते. याच जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री संतोषने सिद्धारामला एका महत्त्वाच्या चर्चेसाठी अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीसमोर बोलावले. दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, त्यानंतर वाद वाढल्याने संतोषने सोबत आणलेल्या कोयत्याने सिद्धारामवर सपासप वार केले. यात सिद्धारामचा जागीच मृत्यू झाला.
भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले त्यांचे भावजी प्रमोद पाटील यांच्यावरही आरोपीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेच्या वेळी सिद्धाराम आपल्या पत्नीशी मोबाईलवर बोलत होता. फोन स्पीकरवर असल्याने कुटुंबीयांनाही संभाषण ऐकू येत होते. अचानक फोनमधून किंकाळ्या आणि झटापटीचे आवाज ऐकू आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
सिद्धाराम रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काही महिन्यांपूर्वीच वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. आता त्याच्या मृत्यूमुळे कटप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड