
पुणे, 21 जून (हिं.स.)। 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविण्याच्यादृष्टीने मृद व जलसंधारण उपचारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील भूजल पातळी वाढीकरिता महत्त्वपूर्ण असलेली ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी दिले.
सचिव पापळकर यांनी पुणे जिल्ह्यातील वाघापूर, गुरोळी, साकुर्डे आदी गावात सुरु असलेल्या पाझर तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, आदी कामांची पाहणी केली.
यावेळी जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता नितीन दुसाने, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, कार्यकारी अभियंता दिपक लांडगे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी पापळकर म्हणाले, जलसंधारण ही काळाची गरज असून, पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी मृद व जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे करावीत. लोकसहभागाद्वारे गाळ काढण्याच्या व नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पापळकर यांनी आवाहन केले, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पावसाळ्यातील पाण्याचा साठा करुन त्याचे सूक्ष्म नियोजन करुन वापर करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु