
लातूर, 21 जून (हिं.स.)। : भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेला योग आज संपूर्ण जगाने स्वीकारला असून निरोगी व संतुलित जीवनासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.
जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विशेष योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, लातूर शहर महानगरपालिका, पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले की, जगातील सुमारे १७० देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास योगाभ्यास करावा. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
योग शिक्षक विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या योग शिष्टाचारानुसार योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर, श्रुष्टी जगताप तसेच पतंजली योग समिती व प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारवाडी राजस्थान माध्यमिक विद्यालय, बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय आणि राजमाता जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही योगाभ्यासात उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी प्रास्ताविक केले. जागतिक योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष योग सत्रे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis