
छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत घडघड कास आणि
राजूर गणपती येथे बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील महिला सेवेकरी भगिनींचा भव्य मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात उपस्थित महिला सेवेकरींशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, सूचना, अपेक्षा तसेच सामाजिक आणि सेवाभावी कार्यासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
समाजसेवा आणि संघटनात्मक कार्यामध्ये महिला सेवेकरी भगिनींनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी “सेवापूर्ती गौरव” उपक्रमांतर्गत सर्व महिला सेवेकरी भगिनींना प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन नगरी अयोध्या येथे दर्शनासाठी नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. या घोषणेमुळे उपस्थित महिला भगिनींमध्ये आनंद, उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
महिला शक्ती ही समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून त्यांच्या योगदानामुळे सामाजिक कार्याला नवी दिशा आणि बळ मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सेवाभाव, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis