अमरावती - जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मनाई
अमरावती, 21 जून (हिं.स.)। मॉन्सूनला होत असलेला विलंब व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी आवर्तन देण्यास मनाई करण्यात आली आहे. सिंचन प्रकल्पातील सर्व पाणीसाठा पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शा
जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मनाई


अमरावती, 21 जून (हिं.स.)। मॉन्सूनला होत असलेला विलंब व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी आवर्तन देण्यास मनाई करण्यात आली आहे. सिंचन प्रकल्पातील सर्व पाणीसाठा पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता मावळली आहे. अमरावती जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांत सद्यस्थितीत ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

अल निनोच्या परिणामामुळे पावसावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेता राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य दिले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यास सिंचनासाठी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा मॉन्सूनची वाटचाल बघता पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून महसूल, जलसंपदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास सांगण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सिंचन प्रकल्प व जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा, तसेच धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित किंवा सुरू असलेली पाणी आवर्तने तात्काळ बंद करण्यात यावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या जलसाठ्याचा अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही. ३१ ऑगस्टपर्यंत आवश्यक त्याप्रमाणात पाणी राखीव ठेवून त्याचा काटेकोर वापर करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात ३९ टक्के जलसाठा

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघू प्रकल्पात आजमितीस ४११ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. सरासरीने तो ३९ टक्के आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व औद्योगिक क्षेत्र मिळून बिगर सिंचन क्षेत्रासाठी साधारणतः १६८ दलघमी साठा आरक्षित करण्यात येतो. सिंचन प्रकल्पातील सद्यस्थितीतील साठा बघता व पावसाची स्थिती लक्षात घेता पुरेसा जलसाठा नाही. त्यामुळे खरीप हंगामात सिंचनासाठी पाणी सोडणे अशक्य होणार असल्याचे चित्र आहे.

पाणीसाठ्याची स्थिती (दलघमी) प्रकल्प उपलब्ध साठा सरासरी

अप्पर वर्धा २४६ ४३

शहानूर १६ ३४

चंद्रभागा ३१ ७६

पूर्णा २१ ५९

सपन १५ ४०

पंढरी ११ २०

गर्गा ० ०

बोर्डी नाला ०.३५

--------------------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande