सोलापुरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; शेकडो नागरिकांचा सहभाग
सोलापूर, 21 जून (हिं.स.)। १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील शेकडो अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके करून योग दिन उत्साहात साजरा केला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक
evm


सोलापूर, 21 जून (हिं.स.)।

१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील शेकडो अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके करून योग दिन उत्साहात साजरा केला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तसेच निरोगी वृद्धत्वासाठी योग अत्यावश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत आणि जिल्हा योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२६ रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार पूनम दंडेले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात पतंजली योगपीठ, भारतीय योग संस्था, विवेकानंद केंद्र, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, योग प्रभा मंडळ, गीता परिवार, सर्वोदय योग साधना मंडळ, योग असोसिएशन सोलापूर, भारत स्वाभिमान ट्रस्ट यांसह विविध योग संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सुरुवातीला शंखवादन आणि योग प्रार्थनेनंतर सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला. यावेळी लता रेवनसिद्ध, मधुकर सुतार, मिलिंद वाईकर, भगवान बनसोडे आणि विशाखा मॅडम यांचा योगगुरू म्हणून सत्कार करण्यात आला.

योग सेवा मंडळाच्या प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध प्राणायाम आणि ध्यानधारणेचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात योगासनांचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि योगाचे आरोग्यविषयक फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कादर शेख, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, तहसीलदार पूनम दंडेले, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शंकर कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी, योग प्रशिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande