
लातूर, 21 जून (हिं.स.)। केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)च्या आरटीसी (प्रशिक्षण केंद्र) लातूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ उत्साह, भव्यता आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत आयोजित योग सत्रात अधिकारी, प्रशिक्षार्थी जवान, महिला कर्मचारी, कुटुंबीय तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
नवआरक्षी प्रशिक्षण केंद्र, सीआरपीएफ, लातूर येथे आयोजित या कार्यक्रमात राजपत्रित अधिकारी, प्रशिक्षणार्थी जवान, महिला कर्मचारी, कुटुंबीय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे शिक्षक, विद्यार्थी आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
योग सत्राचे मार्गदर्शन प्रसिद्ध योगगुरू श्रुतिकांत ठाकूर यांनी केले. त्यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच मानसिक शांतता आणि तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त योगपद्धतींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सहभागी नागरिकांनी योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची संकल्पना योगा फॉर हेल्दी एजिंग (Yoga for Healthy Ageing) अशी असून, वाढत्या वयातही निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis