
कोल्हापूर, 21 जून (हिं.स.)। जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, माय भारत व सार्वजनिक आरोग्य विभाग,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला .
यावेळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी केलेली योगाची प्रात्यक्षिके तसेच पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त विजेता रोहित चव्हाण,१७ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहिणी देवबा व हर्षवर्धन पाटील, इनर्व्हिल क्लब आयोजित योगास्पर्धेत प्रथम क्रमांकासह योगा क्विन पुरस्कार प्राप्त गंधाली खोपकर आदी खेळाडूंचा तर रविभुषण कुमठेकर व संदीप पाटील या योग मार्गदर्शकांचा शाल,रोप तसेच प्रमाणपत्र तसेच देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपूर्ण जगभर 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात योग ही काळाची गरज बनली आहे .योगामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर मानसिक सकारात्मक विचार व निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होते. याप्रसंगी जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानाची शपथ घेण्यात आली.ही शपथ प्रा डॉ.श्वेता पुरुळेकर यांनी उपस्थितांना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar