
* मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य
मुंबई, २१ जून (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील एकूण ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यास मंजुरी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या निर्णयानुसार, मौजे टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील गट क्रमांक १३५० मधील १२.८६ हेक्टर गायरान जमीन, १५.०० हेक्टर शासकीय जमीन तसेच गट क्रमांक ११९४ मधील १९.७७ हेक्टर गायरान जमीन अशी एकूण ४७.६३ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात येणार आहे.
जमीन औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्यात येणार असून, या जमिनीचे कृषिक दराने प्रचलित बाजारमूल्यानुसार मूल्य निश्चित करून त्याची संपूर्ण रक्कम एमआयडीसीकडून वसूल करण्यात येणार आहे. ही जमीन एमआयडीसीला भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने आणि कब्जेहक्काने प्रदान करण्यात येणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात औद्योगिक विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. या निर्णयामुळे शिरोळ परिसरात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. राज्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या जमीन उपलब्धतेच्या प्रक्रियेला शासन अधिक गतिमान करत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी