
सोलापूर, 21 जून (हिं.स.)कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, हमाल, तोलार आणि इतर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या समस्यांकडे सभापती दिलीप माने आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र असलेल्या या बाजार समितीत सध्या अनागोंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर लोकनियुक्त सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळ सत्तेत आले असले तरीही मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
दररोज हजारो शेतकरी आणि व्यापाऱ्यांची वर्दळ असलेल्या या बाजार समितीत स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, शौचालयांची दुरवस्था, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी तसेच माल चोरीच्या वाढत्या घटना समोर आल्या आहेत. २७ एकर परिसरात विस्तारलेल्या या बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी अपेक्षित सुविधा न मिळाल्याने ती शेतकऱ्यांच्या समस्यांचे केंद्र बनत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या सर्व परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड