
परभणी, 21 जून (हिं.स.)।
मानवत तालुक्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या सभागृहाचे छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर परभणी येथील आरपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ राहुल पाटील यांनी आरपी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे उपस्थित होते त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिला. दुर्घटनेतील जखमींना आवश्यक ते सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल तसेच पीडितांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिले.या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis