
रायगड, 21 जून (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त JSW SIP प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांच्या सहभागातून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैली आणि शारीरिक-मानसिक स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ अधिकारी श्री. सी. पी. मंडल यांनी स्वतः पुढाकार घेत उपस्थित कर्मचाऱ्यांसमवेत योगासने व प्राणायाम केले. यावेळी सुमारे २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. सकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांनी उत्साह कायम ठेवत झाडांच्या सावलीत योग दिन साजरा केला.
या कार्यक्रमात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. योगाभ्यासादरम्यानचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण श्री. समीर भायदे आणि सुमन यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी श्री. सी. पी. मंडल यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते तसेच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)