
रत्नागिरी, 21 जून (हिं.स.) । 'द बॉम्बे सॅपर्स'चे कर्नल कमांडंट यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथे माजी सैनिक (ESM), वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'वेटर्नस आऊटरीच प्रोग्राम' (माजी सैनिक जनसंपर्क मोहीम) यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला ७०० हून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिसाद दिला.
माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रेकॉर्ड ऑफिस BEG आणि सेंटर (खडकी), विविध आर्मी रेकॉर्ड ऑफिस, PAO (OR), ECHS, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, AWPO आणि इतर कल्याणकारी संस्थांद्वारे एकूण १७ स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्या माध्यमातून स्पर्श (SPARSH) पोर्टलसंबंधित कामे डिजिटल जीवन प्रमाणपत्र, पेन्शनविषयक बाबी,
ECHS नोंदणी, कायदेशीर मदत, आरोग्य सेवा आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'बॉम्बे सॅपर्स असोसिएशन'चे मानद सचिव लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस (निवृत्त) होते. त्यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी भारतीय लष्कर सदैव कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत (निवृत्त) आणि BEG व सेंटर (खडकी) चे कमांडंट ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आणि योगदानाचा आदर राखत, कार्यक्रमात १७ वीर नारी आणि वीर मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्हासह प्रत्येकी १०,००० रुपये रोख पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान एकूण ६०४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४९२ तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले. उर्वरित प्रकरणांवर पुढील कारवाईसाठी नोंद घेण्यात आली आहे.
वैद्यकीय पथकाद्वारे २७१ माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार पुरवण्यात आले.
या आऊटरीच प्रोग्राममुळे माजी सैनिकांना त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी 'सिंगल-विंडो' (एक खिडकी) प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. माजी सैनिक बांधवांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी