
अमरावती, 21 जून (हिं.स.) मातृत्वाच्या त्यागाचे प्रेरणादायी उदाहरण अमरावतीतील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथील १९ वर्षीय आदिल खा नसीब खा पठाण यांना त्यांच्या आईने किडनी दान करून नवजीवन दिले.
गेल्या सहा महिन्यांपासून आदिलला उच्च रक्तदाब, श्वास घेण्यास त्रास आदी समस्या जाणवत होत्या. तपासणीत त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. अकोला येथे डायलिसिस सुरू असताना किडनी प्रत्यारोपण हाच कायमस्वरूपी पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. मुलाचे प्राण वाचविण्यासाठी आई अंजुम परवीन पठाण यांनी स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युरोलॉजिस्ट डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले तसेच नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे व तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सुमारे पाच ते सहा तास चाललेली ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. रुग्ण व डोनरच्या वैद्यकीय, कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात ट्रान्सप्लांट समन्वयक सतीश वडनेरकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. विशेष म्हणजे ही खर्चिक शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. सध्या रुग्ण आणि डोनर दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी