
पुणे, 21 जून (हिं.स.)। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सार्वजनिक वाहतूक सेवेला मोठे बळ मिळणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत ताफ्यात १,६९३ नव्या बस दाखल होणार आहेत. या बसच्या देखभाल, डेपो आणि पार्किंगसाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे सुमारे १०० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भातील माहिती पीएमपी प्रशासनाने नगरविकास आणि परिवहन राज्यमंत्र्यांना दिली आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात १,९२५ बस असून, त्यापैकी सुमारे १,८०० बस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा पुरवत आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याचा बस ताफा अपुरा पडत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नव्या बस खरेदीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात होणार असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, जलद आणि व्यापक सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु