
पुणे, 21 जून (हिं.स.)।
‘संशोधनावरील विश्वास : भविष्यातील संशोधक – भारत चर्चा’ या विषयावर राष्ट्रीय गोलमेज परिषद सोमवार, २२ जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. शेराटन ग्रँड पुणे बंड गार्डन हॉटेलमधील मॅजेस्टिक हॉलमध्ये होणाऱ्या या परिषदेत देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया (ईपीएसआय) आणि एल्सेव्हियर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही परिषद राष्ट्रीय मालिकेतील दुसरी परिषद आहे. यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या उत्तर भारत विभागीय परिषदेला ९० हून अधिक संशोधकांनी उपस्थिती लावली होती.
उच्च शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात होणाऱ्या या परिषदेला पश्चिम भारतातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्थांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात संशोधनावरील विश्वास अधिक बळकट करणे, संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि जागतिक शैक्षणिक परिदृश्यात पुढील पिढीतील संशोधकांच्या भवितव्यावर सखोल चर्चा घडवून आणणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु