
परभणी, 21 जून (हिं.स.)।
योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे. या संदेशाचा प्रसार करत प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे १२ वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, योग साधक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामूहिक योगासने करून आरोग्यदायी जीवनाचा संकल्प केला.जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, महानगरपालिका, मेरा युवा भारत आणि जागतिक योग उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या जागतिक योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी असून त्यानुसार योगाचे आरोग्यदायी फायदे आणि जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवाडी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधना केली. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन प्राप्त होते. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचारसरणी आणि निरोगी आरोग्य लाभते, असे सांगत त्यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.जागतिक स्तरावर योगाचा प्रसार व्हावा, आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाच्या मान्यतेनंतर २०१५ पासून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे.परभणीतही या उपक्रमाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत असून यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी परभणी जिल्हा योग परिषदेतर्फे योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे व बक्षिसे प्रदान करण्यात आली.जागतिक योग दिन उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषराव जावळे, जिल्हा योग संघटनेचे सचिव कृष्णा कवडी, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले व मिलिंद साळवे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर व रोहन औढेंकर, वरिष्ठ लिपिक रमेश खुने, कनिष्ठ लिपिक गजानन तुडमे, महानगरपालिकेचे रामचंद्र कुलकर्णी व राजकुमार जाधव तसेच अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, परभणीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis