
नांदेड, 21 जून (हिं.स.)जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, नवा मोंढा, नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 23 जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य आसूड मोर्चा संदर्भातील पूर्वनियोजन बैठक संपन्न झाली.
या बैठकीत मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीचा प्रश्न, खतांच्या वाढत्या किमती, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण, बेरोजगारी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis