
पुणे, 21 जून (हिं.स.)पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या तीन विशेष रेल्वे गाड्यांबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा विशेष (स्पेशल) दर्जा काढून त्यांना नियमित रेल्वे सेवेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, तिकीट दरात लक्षणीय घट होणार आहे. विशेष गाड्यांच्या तुलनेत प्रवाशांना जवळपास निम्म्या दरात प्रवास करता येणार आहे.
मध्य रेल्वेने एकूण १४ विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये पुणे, सोलापूर आणि मुंबई विभागातील गाड्यांचा समावेश आहे. पुणे विभागातील गाड्यांमध्ये पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, हडपसर-हरंगुळ एक्स्प्रेस आणि पुणे-दानापूर एक्स्प्रेसचा समावेश आहे.
यासोबतच रेल्वे प्रशासनाने या गाड्यांच्या टर्मिनलमध्येही बदल केले आहेत. यापुढे या गाड्या पुणे रेल्वे स्थानकाऐवजी खडकी आणि हडपसर स्थानकावरून सुटणार आहेत.दरम्यान, प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काही मागण्यांकडेही लक्ष वेधले आहे. विशेषतः खडकी-कोल्हापूर एक्स्प्रेस ही सेवा मुंबईपर्यंत वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुणेकरांसाठी ही अत्यंत उपयुक्त सेवा असल्याने रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु