योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा प्रभावी मार्ग; कुलगुरू गोसावी यांचे प्रतिपादन
पुणे, 21 जून (हिं.स.)। १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जिल्हा परिषद पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. विद्यापीठा
gfd


पुणे, 21 जून (हिं.स.)। १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जिल्हा परिषद पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, प्रा. (डॉ.) धनंजय मंडलिक, प्रा. (डॉ.) देविदास गोलहार, प्रा. (डॉ.) गणेश भामे, डॉ. विलास आढाव, डॉ. वैभव जाधव, डॉ. गीता शिंदे, प्रा. (डॉ.) सुदाम शेळके, डॉ. विष्णु पेठकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. विश्वनाथ पिसे यांनी एम.ए. योग अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने उपस्थितांकडून विविध योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके करून घेतली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या ताणतणावावर योग हा प्रभावी उपाय असल्याचे सांगितले. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, जिल्हा परिषद पुणे येथेही मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उपायुक्त पशुसंवर्धन राजेश वासनिक, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) डॉ. शोएब इनामदार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र हंकारे यांनी योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. नियमित योगामुळे तणाव कमी होतो, कार्यक्षमता वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी योग प्रशिक्षक श्रीमती माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande