रत्नागिरी : बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर श्रीकांत बापट यांची निवड
रत्नागिरी, 21 जून (हिं.स.) । मुर्डी (ता. दापोली) येथील ज्येष्ठ निवृत्त शिक्षक हभप श्रीकांत बापट यांची बालभारती या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर सहावी ते आठवी या स्तरासाठी इतिहास विषयासाठी निवड झाली आहे. यावर्षी प्रसिद्
श्रीकांत बापट


रत्नागिरी, 21 जून (हिं.स.) । मुर्डी (ता. दापोली) येथील ज्येष्ठ निवृत्त शिक्षक हभप श्रीकांत बापट यांची बालभारती या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर सहावी ते आठवी या स्तरासाठी इतिहास विषयासाठी निवड झाली आहे.

यावर्षी प्रसिद्ध झालेल्या सहावीच्या इतिहास पुस्तकाच्या निर्मितीमध्ये समिती सदस्य म्हणून त्यांचे योगदान मोलाचे आहे. श्रीकांत बापट यांनी १९८६ मध्ये शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी अशी सेवा करून प्रकृतिअस्वास्थ्यामुळे एक वर्षा आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली.

त्यांनी विद्यार्थी घडवतानाच यूट्यूबच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दूरस्थ पद्धतीने बीए आणि एमए इतिहास आणि बीएडही पूर्ण केले. शिक्षण विषयात विविध उपक्रम यशस्वीपणे करत असतानाच दूरस्थ पद्धतीनेच चिपळूणचे महेश काळे यांच्याकडे कीर्तन विशारद आणि अलंकार शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विविध ठिकाणी कीर्तन आणि प्रवचन सेवा करताना अभिनय, गायन, निवेदन , व्याख्याने यामध्येसुद्धा ते सतत व्यस्त राहतात. हे सर्व करत असतानाच अॅनिमल कम्युनिकेशनबाबतचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. मुक्या जनावरांशी ते लीलया संवाद साधतात.

आजही या वयामध्ये स्वतः संगीत शिक्षण घेता घेता इतरांनाही त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने दापोली तालुक्यातील मुर्डी या त्यांच्या गावी गुरु देविदास दातार यांच्या माध्यमातून ते गायन कलेचे धडेही घेतात आणि देतात. कोकण प्रॉडक्ट या विषयातदेखील आपल्या पत्नीच्या समवेत त्यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे.

बालभारती पुणे च्या पुस्तक मंडळावरील सदस्य समितीमध्ये श्रीकांत बापट यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande