
सोलापूर, 21 जून (हिं.स.)।
जिल्ह्यातील अवैध हातभट्टी निर्मिती आणि मद्य विक्रीविरोधात “ऑपरेशन समन्वय” अंतर्गत मुळेगाव तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मोठी संयुक्त धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उप आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पथके, भरारी पथक, वन विभाग, महावितरण, ग्रामीण पोलिस स्टेशन तसेच महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत अवैध हातभट्टी केंद्रावर छापा टाकून सुमारे ४२५० लिटर रसायन जप्त करण्यात आले. तसेच देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री आणि वाहतुकीप्रकरणी ३ गुन्हे दाखल करून ३ जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण सुमारे ८,२५,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ४०० मीटर वीजतारही जप्त करण्यात आली असून सुमारे ८ हजार रुपयांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
यापूर्वी ४ जून २०२६ रोजीही शहरातील रामलाल चौक आणि स्टेशन रोड परिसरात अवैध मद्यपान करणारे, टपऱ्या, सोडा गाड्या आणि साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, १ एप्रिल ते १९ जून २०२६ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ७०८ गुन्हे दाखल करून ५६ वाहने जप्त केली असून सुमारे २ कोटी ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अवैध हातभट्टीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणांच्या समन्वयाने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती नागरिकांनी टोल फ्री १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर द्यावी, माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड