डॉ. जनार्दन वाघमारे स्मारकासाठी शिष्टमंडळाचे कुलगुरूंना साकडे
लातूर, 21 जून (हिं.स.)। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू कै. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंचच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू
जनार्दन वाघमारे


लातूर, 21 जून (हिं.स.)।

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू कै. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंचच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट घेऊन केली.

मराठवाड्यात उच्च शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे थोर शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी आणि विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास जतन व्हावा, या उद्देशाने विद्यापीठात आधुनिक स्वरूपाचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली.

17 सप्टेंबर 1994 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. स्थापनेच्या प्रारंभी अनेक प्रशासकीय आणि शैक्षणिक आव्हाने असतानाही डॉ. वाघमारे यांनी 17 सप्टेंबर 1994 ते 16 सप्टेंबर 1999 या कालावधीत संस्थापक कुलगुरू म्हणून दूरदृष्टीने काम केले. विद्यापीठाची इमारत, विविध अभ्यासक्रम, महाविद्यालय संलग्नता तसेच नोकरभरतीची मजबूत पायाभरणी त्यांनी केली.

शिष्टमंडळाच्या मते, हे स्मारक केवळ एका व्यक्तीचे स्मारक नसून विद्यापीठाच्या निर्मिती पर्वाचे प्रतीक ठरेल. यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव कायम राहील.

या शिष्टमंडळात विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुधीर साळुंखे, सचिव डॉ. दिगंबर नेटके, सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. सतीश यादव, डॉ. विनोद चव्हाण, विक्रम कदम आणि ॲड. निशांत वाघमारे आदींचा सहभाग होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनीही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या स्मारकासंदर्भात सूचना केल्याचे समोर आले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande