
रायगड, 21 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनातील विलंब आणि घटलेला जलसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) २० ते ३० जून २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर किंवा सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनचे आगमन अपेक्षेप्रमाणे झाले नसून उष्णतेची तीव्रता कायम आहे. पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १७.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच हेटवणे मध्यम प्रकल्पात २७.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महावेध पोर्टलवरील नोंदीनुसार २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ८.९ मि.मी. म्हणजे सुमारे २ टक्के पाऊस झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी स्विमिंग पूल बंद ठेवणे, पाणीपुरवठ्यात आवश्यक कपात करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि अनधिकृत पाणीवापर रोखणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.
सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी, पनवेल महानगरपालिका, ग्रामपंचायती, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलाव तात्काळ बंद राहतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)