
बीड, 21 जून, (हिं.स.)। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बीड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, अपुऱ्या वर्गखोल्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड मजूर व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या व दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तातडीने ९ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बीड तालुक्यातील २२ जिल्हा परिषद शाळांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही. तसेच ११ ठिकाणी शाळा बांधण्यासाठी जागेचा प्रश्न आहे. २२ शाळांमधील ४३ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय ८ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याने १२ नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ८ कोटी २८लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
तसेच बीड तालुक्यातील ५२ शाळांमधील ६९ वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असून त्यासाठी १ कोटी ३ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळा पुनर्बांधणी, नवीन वर्गखोल्या आणि दुरुस्ती या सर्व कामांसाठी एकूण ९ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात जीर्ण इमारतींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis