
अमरावती, 21 जून (हिं.स.) खरीप हंगामाला सुरवात झाली असून अनेक भागांमध्ये पेरणीपूर्व तयारीला वेग आला आहे. मात्र याच काळात शेतकऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. कृषी केंद्रांमध्ये युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागत असून कृषी विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त होणार आहेत.
पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र अनेक कृषी सेवा केंद्रांवर युरिया उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. काही ठिकाणी मर्यादित साठा असल्याने शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा कमी खत दिले जात असल्याचीही तक्रार आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पेरणीचा हंगाम सुरू असताना युरियासारख्या महत्त्वाच्या खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. मात्र वेळेवर नियोजन न झाल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही शेतकरी खत मिळविण्यासाठी एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात चकरा मारत आहेत. दरम्यान, कृषी विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व कृषी केंद्रांवर युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करावीत आणि शेतकऱ्यांना वेळेत खत मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आदिवासी बांधवांची पायपीट चिखलदरा तालुक्यातील चुरणी, काटकुंभसह चिखलदरा तालुक्यातील अनेक भागांत युरियाची मोठी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना युरियासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. आदिवासी बांधवांना युरिया मिळत नसल्यामुळे ते परतवाडा, धारणी, धामणगाव आदी अनेक भागांत फिरत आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी