तिरंगा मालिकेच्या फायनलमध्ये वैभवचा कहर; ११ चेंडूत फिफ्टी
रायगड, 21 जून (हिं.स.)। : भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या तिरंगा मालिकेच्या अंतिम सामन्यात तुफानी फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या १५ वर्षीय वैभवने केवळ ११ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट ‘अ’ क
तिरंगा मालिकेच्या फायनलमध्ये वैभवचा कहर; ११ चेंडूत फिफ्टी


रायगड, 21 जून (हिं.स.)। : भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या तिरंगा मालिकेच्या अंतिम सामन्यात तुफानी फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या १५ वर्षीय वैभवने केवळ ११ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

रंगिरी दांबुल्ला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशीने आक्रमक पवित्रा स्वीकारत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. पहिल्याच षटकात चौकाराने खाते उघडणाऱ्या वैभवने त्यानंतर चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला.

विशेष म्हणजे या स्पर्धेत मागील काही सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. तसेच एका खेळाडूसोबत झालेल्या वादामुळेही तो चर्चेत होता. मात्र अंतिम सामन्यात त्याने सर्व टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिले. श्रीलंकेचा गोलंदाज मोहम्मद शिराजच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकार ठोकत त्याने तब्बल २६ धावा कुटल्या.

त्याच्या या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघाला दमदार सुरुवात मिळाली. वैभवच्या विक्रमी अर्धशतकाने केवळ सामन्याचे चित्र बदलले नाही, तर जागतिक क्रिकेटमध्ये नव्या प्रतिभेचा उदयही अधोरेखित केला. अल्पवयातच जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भारतीय क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande