
लातूर, 21 जून (हिं.स.)। लातूर- नांदेड महामार्गावरील घरणी गावाजवळ दरोडेखोरांनी दाेन कार अडवून त्यातील प्रवाशी कुटुंबियास बेदम मारहाण करुन सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख असा एकूण ३ लाख ४७ हजार २५० रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत एका महिलेच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.
लातुरातील व्यापारी कांताप्रसाद पुष्करलाल तापडिया हे कुटुंबासह कार (एमएच २४, बीएल ०६००) ने देवदर्शनासाठी गेले होते. ते परतताना घरणीनजिक पोहोचले. तेव्हा कशातरी मोठा आवाज आल्याने चालकाने कार बाजूला घेतली. त्याच क्षणी २० ते २५ वयोगटातील चार अनोळखी धावत आले आणि त्यांनी कारचा थेट दरवाजा उघडला व आतील महिला- पुरुषांना काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
सिमा तापडिया यांच्या गळ्यातील ५ तोळ्याचे मंगळसूत्र, बहिण शकुंतला बियाणी यांच्या हातातील १.२० लाखांच्या ४ बांगड्या, मुलगी स्नेहा हिच्या पर्समधील २ हजार ५०० रुपये असा ऐवज पळविला. एकूण २ लाख ४३ हजार २५० रुपयांचा ऐवज पहिल्या गाडीतून दरोडेखोरांनी लुटला.
त्यानंतर पाठोपाठ येणारी कार (एमएच ४०, सीक्यू ६४८१) ही दरोडेखोरांनी अडविली. त्या कारमधील माधव दिवेकर यांची ५० हजारांची अंगठी, १० हजारांचे मंगळसूत्र व सुलभा जिवितोड यांची चांदीची चैन हिसकावून घेतली. दोन्ही घटनेत एकूण ३ लाख ४७ हजार २५० रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. विशेष म्हणजे, अन्य एक कार थांबविण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र चालकाने कार न थांबविता निघून गेला. याप्रकरणी कांताप्रसाद तापडिया यांच्या फिर्यादीवरुन चाकूर पोलिसांत कलम ३०९, १२६ (२) ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडेखोरांनी कारमधील महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, चैन ओरबाडून घेतल्या. त्यामुळे महिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बालाजी भंडे, सपोनि. श्रीकांत शेंडगे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आली. पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन भातलवंडे, स्थागुशाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली.
प्रवासादरम्यान, संशयास्पद आवाज आल्यास अथवा कोणी थांबविण्याचा प्रयत्न केल्यास वाहन न थांबविता जवळच्या पोलिस ठाणे अथवा टोल नाक्यावर जावे. डायल ११२ वर तातडीने संपर्क करावा, असे आवाहन पोनि. बालाजी भंडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis