
अमरावती, 21 जून (हिं.स.)। मॉन्सूनच्या दिवसांमध्ये पूरस्थितीमुळे उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात ४५७ जोखीमग्रस्त गावे असून ती नदीच्या काठावर आहेत. या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून पूरस्थितीमुळे संपर्क तुटल्यास तातडीची उपाययोजना करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथजन्य आजारांचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असतो. तो टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी साथरोग नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर सुद्धा नियंत्रण कक्षाची व्यवस्था राहणार आहे.
दरवर्षी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत असतो. अनेक गावांमध्ये जलस्रोत नाल्याच्या काठी असून पावसाळ्यात नाल्याचे घाण पाणी पिण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याने अनेकदा साथजन्य आजारांचा उद्रेक होत असतो. यंदासुद्धा जोखमीच्या गावांकडे आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे. जिल्ह्यातील १६ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटत असतो. त्या गावांकडे विशेष लक्ष असून तेथे आरोग्य पथक मुक्कामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी दिली. प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरेसा औषधसाठा असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकाच ग्रामपंचायतला धोक्याचे रेडकार्ड देण्यात आले असून अचलपूर तालुक्यातील शिंदी या गावाकडे विशेष लक्ष राहणार आहे. १३१ केंद्रांवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध ठेवली जाणार आहे. जिल्हास्तरावर एक, तर १४ तालुक्यांच्या ठिकाणी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
नदीकाठच्या गावांची संख्या अमरावती ः २२, भातकुली ः ३५, नांदगाव खंडेश्वर ः २४, दर्यापूर ः४८, अंजनगावसुर्जी ः ५८, अचलपूर ः ५५, चांदूरबाजार ः २६, चांदूररेल्वे ः ६, धामणगावरेल्वे ः २७, तिवसा ः ४८, मोर्शी ः ३८, वरुड ः ५१, धारणी ः ७, चिखलदरा ः १२.
संपर्क तुटणारी गावे चिखलदरा ः हतरू (प्रा. आ. केंद्र) ः डोमा, कुही, कुटीदा, प्रा. आ. केंद्र सेमाडोह ः राक्षा, रेट्याखेडा, बोराट्याखेडा, प्रा. आ. केंद्र ः काटकुंभ ः बिच्छुखेडा, बोडू, माडीझडप धारणी ः प्रा. आ. केंद्र बैरागड ः कुंड, किन्हीखेडा, खामदा, प्रा. आ. केंद्र बिजूधावडी ः पारसोली, प्रा. आ. केंद्र हरिसाल ः कोकमार, चोपन, टांगडा.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी