
रायगड, 21 जून (हिं.स.)। जिल्ह्यात मान्सूनच्या विलंबामुळे पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून धरणांतील उपलब्ध जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता 68.515 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) असताना सध्या केवळ 13.287 एमसीएम पाणी उपलब्ध असून उपयुक्त साठा अवघ्या 19.39 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामीण भागातील विहिरी, नद्या आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात सध्या 78 हून अधिक टँकर्सच्या माध्यमातून सुमारे दीड लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार उपलब्ध पाणीसाठा जेमतेम 10 ते 15 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.
तालुकानिहाय पाहता सुधागडमध्ये सर्वाधिक 13.418 एमसीएम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यानंतर खालापूरमध्ये 9.960 एमसीएम, महाडमध्ये 8.371 एमसीएम, श्रीवर्धनमध्ये 6.106 एमसीएम आणि पनवेलमध्ये 5.600 एमसीएम साठा आहे. कर्जतमध्ये 4.230 एमसीएम, म्हसळामध्ये 4.013 एमसीएम, उरणमध्ये 3.710 एमसीएम, तळामध्ये 3.134 एमसीएम, अलिबागमध्ये 2.953 एमसीएम, पेणमध्ये 2.490 एमसीएम, मुरुडमध्ये 2.266 एमसीएम तर रोहा तालुक्यात सर्वात कमी 2.264 एमसीएम पाणी उपलब्ध आहे.
रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी जलसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पाणीकपात करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक वापरासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात सुरू केली असून आकस्मिक आराखडाही तयार करण्यात येत आहे.
आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकाशाकडे लागले असून दमदार पावसाशिवाय या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)