
परभणी, 21 जून (हिं.स.)।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी मेळाव्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेना सध्या कठीण परिस्थितीतून जात असली तरी पक्षातील निष्ठावंत शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. काही लोक पक्ष सोडून जात असले तरी त्याचा शिवसेनेवर किंवा सामान्य शिवसैनिकांवर कोणताही परिणाम होणार नाही. आपण सर्वांनी एकसंघ राहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी परभणीत मुक्कामी येणार असून रविवार, 28 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीस जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, जालना जिल्हाप्रमुख महेश नळगे, ज्येष्ठ नेते कल्याणराव रेंगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, इतर पक्षांकडून कोणत्याही कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल तर कुणीही घाबरू नये. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्याचे आवाहन करताना त्यांनी, परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी. मेळाव्यात पक्षप्रमुख जो आदेश देतील, त्यानुसार पुढील राजकीय दिशा ठरवली जाईल, असे नमूद केले. विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना आमदार पाटील यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. मर्यादित मतसंख्या असूनही आम्ही स्वाभिमानाने निवडणूक लढवली आहे. निष्ठा आणि पक्षावरील विश्वासाच्या जोरावर विजय आमचाच होईल, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis