योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी : सीईओ विवेक गायकवाड
छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी व संतुलित जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले. संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर बारावा आंतर
Q


छत्रपती संभाजीनगर, 21 जून (हिं.स.)। योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी व संतुलित जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले. संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती तसेच विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी 14 जून रोजी आयोजित ऑनलाईन योग शिबिरामध्ये 4 लाख नागरिकांनी सहभाग नोंदवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याचा उल्लेख केला. योग दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन, मन आणि धनाने सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

योगगुरु रत्नाकर महाजन यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने आपल्या मित्रपरिवार व कुटुंबीयांमध्ये योगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांकडून सराव करून घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या योग शिबिरास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, योगाभ्यासी मंडळांचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande