
पुणे, 21 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. शहरात पिण्याच्या पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी याबाबत आदेश जारी केले असून, वारंवार नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
नवीन आदेशानुसार पाणी कपातीच्या कालावधीत सार्वजनिक आणि खासगी वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक आणि खासगी स्विमिंग पूल, खासगी उद्याने यांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय वाहन धुणे, पदपथ स्वच्छ करणे आणि अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु