वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेला दुखापतीमुळे मुकणार
नवी दिल्ली, 21 जून, (हिं.स.)श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-२० संघ या महिन्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे. पण या दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने रविवारी ही घोषणा के
वरुण चक्रवर्ती


नवी दिल्ली, 21 जून, (हिं.स.)श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-२० संघ या महिन्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे. पण या दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने रविवारी ही घोषणा केली. मंडळाने एक निवेदन जारी करून चक्रवर्तीच्या तंदुरुस्तीबद्दल माहिती दिली. मंडळाने म्हटले आहे की, डाव्या पायाला दुखापत झालेला चक्रवर्ती 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहे. तो आयर्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. आयपीएल २०२६ दरम्यान चक्रवर्तीला ही दुखापत झाली होती.

कोलकाता नाईट रायडर्सचा 'मिस्ट्री' फिरकी गोलंदाज चक्रवर्ती ८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. यामुळे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धचा पुढील सामना खेळू शकला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनीही फ्रॅक्चरची पुष्टी केली होती. पण पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही, चक्रवर्तीने गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे सामने खेळण्यासाठी पुनरागमन केले होते. तो वेदना सहन करून खेळला. गुजरातविरुद्धच्या सामन्यात, वेदना होत असूनही चक्रवर्ती गोलंदाजी करताना दिसला होता. आपल्या कोट्यातील पूर्ण चार षटके टाकल्यानंतरही तो टीकेचा धनी ठरला.

भारताचा आयर्लंड दौरा २६ जून रोजी सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. दोन्ही सामने २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे खेळले जातील. त्यानंतर संघ इंग्लंडला जाईल, जिथे ते १ ते ११ जुलै दरम्यान यजमानांविरुद्ध पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील.

आयर्लंड टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारताचा अद्ययावत संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिद्ध कृष्णा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande