आ. सुरेश धस मतदारसंघातील विविध शैक्षणिक, कृषी व रोहयोशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा
बीड, 22 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेऊन आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध शैक्षणिक, कृषी व रोजगार हमी योजनांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. व्ही. रमणी प
Q


बीड, 22 जून (हिं.स.)।

जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची आमदार सुरेश धस यांनी भेट घेऊन आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध शैक्षणिक, कृषी व रोजगार हमी योजनांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

व्ही. रमणी पॅटर्नच्या धर्तीवर सुरू असलेल्या मिशन जरेवाडी पॅटर्नची चालू शैक्षणिक वर्षात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच मतदारसंघातील तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करून नव्याने बदली होऊन आलेल्या शिक्षकांना कामकाजाची नियमावली, शैक्षणिक उपक्रम व प्रशासनिक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात यावे, अशी विनंती केली.

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षकांसह इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची कमतरता असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करताना आष्टी व पाटोदा तालुक्यातील रिक्त पदांना प्राधान्य देण्याची मागणी केली.

तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सार्वजनिक कामांसह सिंचन विहीर, शेततळे, गायगोठा आदी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आवश्यक कुशल मजुरी निधी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून तो तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती केली.

यावेळी एल-निनोच्या परिणामामुळे पावसाला झालेला विलंब आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चारा टंचाईच्या संभाव्य संकटाकडेही लक्ष वेधले. आष्टी व पाटोदा तालुके हे मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन करणारे भाग असून, वेळेत पाऊस न झाल्यास पशुधनासमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पशुधन संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने धोरणात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande