

नेरळ, ता. 22 जून (प्रतिनिधी): अंध अपंग विकास संस्था, वारे आणि अंध अपंग सामाजिक विकास संस्था, नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील धारप सभागृहात 21 जून रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात नेरळ विद्या मंदिर, विद्या विकास मंदिर आणि रा. जी. प. कन्या शाळेतील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय सुमारे 500 विद्यार्थ्यांना वह्या, लेखन साहित्य आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर विद्यार्थी जीवनात मोठे यश मिळवू शकतात, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले असून त्यांच्यात शिक्षणाबाबत प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. विशेषतः गरजू विद्यार्थ्यांना या साहित्य वाटपाचा मोठा लाभ मिळाला.
कार्यक्रमास उद्योजक रामशेठ राणे, डॉ. निर्मला राव, प्रवीण यकवाड, पंचायत समिती कर्जतच्या सदस्या सौ. सुनिता मोरे, सौ. श्रीखंडे, विजय भागवत, कृष्णा कदम, दत्ता तुपे, रायगड भूषण अरुण तुकाराम जोशी, सुनील राजे, निखील म्हसे, बळीराम राणे, रवींद्र वझरकर, गणेश क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)