इंडो-जर्मन टूल रूम आणि अमृतचा विशेष उपक्रम; खुल्या प्रवर्गातील युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी
रायगड, 22 जून (हिं.स.)। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी), पुणे आ
A-special-initiative-by-Indo-G


रायगड, 22 जून (हिं.स.)। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी), पुणे आणि भारत सरकारची संस्था इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना अत्याधुनिक तांत्रिक कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी तसेच व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

इंडो-जर्मन टूल रूमची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे असून महाराष्ट्रात पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूंज येथेही उपकेंद्रे कार्यरत आहेत. संभाजीनगर येथील केंद्रात निवासी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध असून प्रशिक्षण, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था अमृतमार्फत केली जाणार आहे. अमृत आणि आयजीटीआर यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार सुमारे ४५ विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रशिक्षणामध्ये सीएनसी मशीन ऑपरेटर, मशिनिंग तंत्रज्ञान, उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक देखभाल कौशल्ये, संगणक आधारित तांत्रिक प्रशिक्षण तसेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक इतर आधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार असून नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या युवकांसाठी अमृत संस्थेची वैयक्तिक व्याज परतावा योजना उपलब्ध असून उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व विविध शासकीय योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील १८ ते ४० वयोगटातील पात्र युवक-युवती अर्ज करू शकतात. इच्छुकांनी अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा व्यवस्थापकांशी ९११२२२८७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande