
रायगड, 22 जून (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने औंध येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आलेले पाच दिवसीय निवासी कर्मचारी प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि अमृत सखी यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग नोंदविला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच चारित्र्यनिर्माणाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यक्तीनिर्माणातून चारित्र्यनिर्माण आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती घडते, असे सांगत प्रत्येक नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेला असावा, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून कार्य करताना स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अमृतचे प्रतिनिधी म्हणून कर्मचारी नव्हे, तर कार्यकर्ता या भावनेने कार्य केल्यास समाजपरिवर्तनाचे ध्येय अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते, असे वक्त्यांनी स्पष्ट केले. कामातून माणसे जोडणे तसेच कार्याची गुणवत्ता आणि व्याप्ती सातत्याने वाढविण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासूनच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेतला. राज्यभरातील विविध संस्थांकडून अमृतच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे सांगत त्यांनी प्रशिक्षणाद्वारे नवीन कौशल्ये, कल्पना आणि उपक्रम आत्मसात करून अधिक जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने करण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांवरील मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि अनुभवांची देवाणघेवाण यामुळे सहभागींच्या ज्ञानात आणि कौशल्यात लक्षणीय वाढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षण शिबिरामुळे अमृतच्या कार्यकर्त्यांना समाजहिताच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नवी दिशा आणि प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)