काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र यावे : डॉ. वनकर
लातूर, 22 जून (हिं.स.)। लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महा
काँग्रेस


लातूर, 22 जून (हिं.स.)।

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर तसेच लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

संविधान हाच आपला प्राणवायू : डॉ. वनकर

सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिरुद्ध वनकर म्हणाले की, संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी आज संघर्ष करण्याची गरज आहे. संविधानामुळेच सर्वसामान्य नागरिक, महिला आणि वंचित घटकांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे संविधान हा आपला प्राणवायू असून त्याच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व ५९ जातींसह अठरापगड जाती-धर्मातील लोकांनी एकजूट दाखवून संविधानवादी विचारांना बळ द्यावे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि देशात काँग्रेसचे नेतृत्व सत्तेत आणणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गावपातळीपर्यंत संघटन विस्ताराचा निर्धार

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी डॉ. वनकर यांची नियुक्ती आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना बळ देणारी असल्याचे सांगितले. माजी मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्ह्यात गाव, वॉर्ड आणि प्रभाग स्तरावर अनुसूचित जाती विभागाच्या शाखा स्थापन करून काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande