
सोलापूर, 22 जून (हिं.स.)।
आषाढी वारीनिमित्त लाखो महिला वारकरी आणि भाविक सोलापूर जिल्ह्यात दाखल होत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी मार्गावर यंदा 170 हिरकणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षांच्या व्यवस्थापनासाठी 364 अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आषाढी वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर मानाच्या पालख्यांबरोबर लाखो महिला वारकरी जिल्ह्यात प्रवेश करतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या सोयीसाठी विशेष नियोजन केले आहे.
हिरकणी कक्षांमध्ये बेड, खुर्च्या, मॅट, सॅनिटरी पॅड, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह आणि शौचालयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरांवर नियोजन करत आहे. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या हिरकणी कक्षांमुळे महिला वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
दरम्यान, मागील वर्षी महिला आयोगाकडून करण्यात आलेल्या सूचनांचा विचार करून यंदा अधिक सक्षम व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा दरवर्षी या कक्षांना भेट देऊन सुविधांची पाहणी करत असून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही देत असतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड